विराट कोहली… क्रिकेटच्या जगातील एक नामवंत नाव आणि अस्सल खेळाडू.. अनेकांचा तो आदर्श आहे, त्याच्यासारखं खेळण्याची, त्याच्याकडून शिकण्याची बऱ्याच खेळाडूंना इच्छा असते. दिल्लीचा फलंदाज सनथ सांगवान याने रणजी ट्रॉफी 2025-206 सीझनची सुरूवात जोरदार केली आहे. फक्त दोन सामन्यांच्या फेऱ्यांमध्ये त्याने उत्तम फलंदाजी करत लक्षणीय धावा केल्या. सनथची स्थानिक कामगिरी केवळ दिल्ली संघासाठीच नाही तर संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा विषय बनली आहे. पण त्याचं कारणही विराट कोहली आहे, कारण गेल्या सीझनच्या शेवटीही तो विराटमुळेच चर्चेत आला होता. सनथ सांगवान याने सध्याच्या सीझनमध्ये 2 मॅचमध्येच तब्बल 347 धावा केल्या असून धावांच्या शर्यतीत तो सध्या चौथ्या स्थानी आहे.
सनथने हंगामाची सुरुवात हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्याने केली, जिथे त्याची कामगिरी अतिशय शानदार होती, आणि त्याने पहिल्याच डावात खणखणीत द्विशतक झळकावलं. 21 चौकार आणि 2 षटक ठोकत त्याने 211 धावांची खेळी केली. एवढंच नव्हे तर दुसऱ्या डावातही त्याने हार मानली नाही, त्या डावात सनथ याने 105 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या. या कामगिरीमुळे सनथ लगेचच चर्चेत आला.
तर दुसऱ्या फेरीत हिमाचल प्रदेशविरुद्ध सनथने अशीच कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने 170 चेंडूत 8 चौकारांसह 79 धावांची उपयुक्त खेळी केली. पण त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात मात्र तो अवघी 1 रन काढून आऊट झाला. पण एकंदरच त्याचं योगदान अतिशय उत्तम, शानदार होतं. या दोन सामन्यांमध्ये सनथच्या फलंदाजीने त्याची मोठा डाव खेळण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या फॉर्ममुळे दिल्लीला ट्रॉफी जिंकण्याची शक्यता वाढू शकते.
विराट कोहलीने दिल खास गिफ्ट
एक विशेष गोष्ट म्हणजे रणजी ट्रॉफी 2024-2025 च्या दिल्लीच्या शेवटच्या मॅचमध्ये विराट कोहलीने सनथ सांगवानला एक खास गिफ्ट दिलं होतं. बऱ्याच काळानंतर रणजी ट्रॉफी सामन्यात खेळणाऱ्या कोहलीने सामन्यानंतर सनथला त्याची सही केलेली बॅट भेट दिवी,एवढंच नव्हे तर त्याने त्याची संपूर्ण किट बॅगही सनथला दिली. कोहलीने सनतच्या जर्सी वर देखील सही केली जी त्याच्यासाठी प्रेरणास्रोत ठरली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना सनथने खास कॅप्शन लिहीली होती. किंग कोहलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे हा सन्मान होता, असं त्याने नमूद केलं. हा क्षण सनतच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि त्याचा सध्याचा फॉर्म त्या प्रेरणेचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.






