माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर-हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान बच्चू कडू तसेच आंदोलकांनी सहा वाजेच्या आत आंदोलनस्थळ सोडावे असा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यानंतर कडू यांनी आम्ही येथून हटायला तयार आहोत, पण आमच्या आंदोलनाची सोय पोलीसांनी करावी असं म्हटलं आहे. यानंतर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले शेट्टी ?
राजू शेट्टी म्हणाले की, ‘सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारने ठरवलेलं आहे. सरकारमध्ये जे कोणी म्होरके आहेत ते मला माहिती आहेत, अशा पद्धतीने जर शिखंडीचा डाव खेळत असाल तर कंबरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा. महात्मा गांधीनी या देशाला सत्याग्रह शिकवला, सविनय कायदेभंग शिकवला. याच्या माध्यमातून देशातील सामान्य माणसाने गांधींजींच्या नेतृत्वाखाली एक थेंबही रक्त न सांडता इंग्रजांना देश सोडून जायला लावला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आदर्श संविधान तयार करण्यात आलं. या संविधानाचा आदर करणारे आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही न्यायव्यवस्थेचाही आदर करतो.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, ‘मी लोकसभेचा सदस्य म्हणून काम केलेले आहे. एक सामान्य नागरिक म्हणून बोलण्याचा मलाही अधिकार आहे. न्यायालय म्हणजे ब्रम्हदेव नाही. आज सत्याग्रहाला न्याय मिळत नसेल तर न्यायव्यवस्थासुद्धा भरकटत चालली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्ही शिकंडीसारखा कायद्याच्या माध्यमातून आमच्यावर वार केला असेल, पण भविष्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील.
बच्चू भाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला इथून घेऊन जायचं आहे, मैदान खाली करायचं आहे ना? आम्ही दोन्ही हात वर करून सरेंडर करायला तयार आहोत. आम्ही तुमच्या ताब्यात यायला तयार आहोत, तुम्ही आम्हाला घेऊन जा. आम्हाला कसं ताब्यात घ्यायचं ते तुम्ही ठरवा. आमच्या भगिनी आहेत, रात्री अपरात्री त्यांच्या सुरक्षेचं काय? दिव्यांग लोक आहेत त्यांचं काय? त्यांनी कुठं जायचं?
देवेंद्र फडणवीसांना इशारा
राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, ‘मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो, रडीचा डाव खेळायला सुरूवात तुम्ही केलेली आहे, आगे आगे देखा होता है क्या… हे काय आम्हाला कळत नाही काय? बच्चू भाऊंनी सांगितलं तस… दररोज 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत, चिखलात लोळून-लोळून आत्महत्या करत आहेत. त्यावेळी या न्यायव्यवस्थेचे डोळे फुटले होते का? याची दखल कोणीही घेतली नाही. न्यायालयाचा अपमान केला म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल कराल. आंदोलवाची जागा खाली करण्याच्या ऑर्डरवर सही करताना तुमचे हात कचरले नाहीत का? ही सगळी गरीब माणसं आहेत. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी तोट्यात आहे असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.’






