आयपीएलच्या 19 व्या मोसमाला (IPL 2026) फार वेळ आहे. मात्र त्याआधी मिनी ऑक्शनकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. त्याआधी नेहमीचाच आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन आणि बॅट्समन महेंद्रसिंह धोनी यंदा खेळणार की नाही? याबाबत सीएसकेचे सीईओ यांनी उत्तर दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनी निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलं. याचा अर्थ धोनी आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. “आपण धोनीला आयपीएल 2026 स्पर्धेत नक्की पाहू” असा विश्वास विश्वनाथन यांनी व्यक्त केला.
धोनीने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 14 सामन्यांत सीएसकेचं प्रतिनिधित्व केलं. धोनीने या 14 सामन्यांमध्ये 135 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. धोनीने या दरम्यान 12 षटकार आणि तेवढेच अर्थात 12 चौकार लगावले.
धोनीला आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान अचानक नेतृत्व करावं लागलं होतं. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीनंतर उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा स्वीकारली.
धोनी आयपीएलच्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सातत्याने सलग खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. धोनीने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत एकूण 278 सामन्यांमध्ये 38.30 च्या सरासरीने 5 हजार 439 धावा केल्या आहेत.



