ज्या ठिकाणी इंटरनेट पोहोचत नाही, तिथेही वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्राचा करार झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. स्टारलिंक करार करणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मुंबईत स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांचे स्वागत करणे आनंदाची बाब होती. महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर आज स्वाक्षरी केली. यामुळे शासकीय कार्यालये, ग्रामीण भागात आणि गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या महाराष्ट्रातील दुर्गम आणि वंचित भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंकसोबत औपचारिकपणे सहयोग करणारे महाराष्ट्र पहिले भारतीय राज्य ठरले आहे.”
“एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान (ICT) क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिच्याकडे जगातील सर्वाधिक दळणवळण उपग्रह आहेत. ही कंपनी भारतात येत आहे आणि महाराष्ट्रासोबत भागीदारी करत आहे, हा आमच्यासाठी सन्मान आहे”, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
या महाराष्ट्र-स्टारलिंक सहकार्यामुळे राज्याच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल महाराष्ट्र मिशनला वेग मिळेल आणि राज्यातील इलेक्ट्रिक वाहने, किनारी विकास आणि आपत्ती प्रतिरोधक क्षमता कार्यक्रमांनाही फायदा होईल.
स्टारलिंकसोबत करार केल्यामुळे राज्याच्या दुर्गम भागातही इंटरनेट सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. स्टारलिंक ही जगात सर्वाधिक सॅटेलाईट असणारी कंपनी आहे. याचा फायदा आदिवासी शाळा, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्र डिजिटल करण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.



