हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, हुंड्यासाठी नववधुला त्रास, माहेरहून पैसे आणण्याचा हट्ट करत त्रास देण्याचे प्रकार आजही महाराष्ट्रात घडत आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले होते, या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला होता. कारण, मुलीच्या वडिलांनी लग्नात अलिशान कार गिफ्ट देऊनही मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं होतं. त्यानंतर, अद्यापही असे प्रकार राज्यात घडत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड येथील संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने (Marriage) जीवन संपवल्याने संतप्त कुटुंबीयांनी सासरच्या दारातच आपल्या लेकीची चिता पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले. मोबाईल, गाडी व घरून पैसे आण, अशा वारंवार मागण्या, यावरून नेहमी वाद व शिवीगाळ केली जात असल्याने विवाहिता कंटाळली होती. सासरी सातत्याने होणाऱ्या या छळामुळे मोहिनी चंद्रकांत अहिरे हिने टोकाचे पाऊल उचलले. 22 वर्षीय विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेत जाब विचारला. त्यानंतर, दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांना तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांना दारात मुलीच्या मृतेदावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला. या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांवर चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून यातील सर्व संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.



