स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोबतच पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता, दरम्यान हे इनकमिंग अजूनही सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोडांवर सुरू असलेली पक्षगळती महाविकास आघाडीमधील पक्षांसाठी डोके दुखीचा विषय बनली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांनी गेल्यावेळी भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या डोंबिवली जिमखाना येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवली महानगपालिकेतील राजकीय समीकरण बदलणार आहेत. दीपेश म्हात्रेंचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासोबतच एकनाथ शिंदे यांनाही मोठा धक्का मानला जात आहे. मगच्या वर्षी चार माजी नगरसेवकांसोबत दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राम राम ठोकून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र तरी देखील दीपेश म्हत्रे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत होते, मात्र आता दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. अखेर रवींद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रेंच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करून, एका दगडात दोन पक्षी मारल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


