मागील काही दिवसांपासून देशातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. सध्या काही भागात कडाक्याची थंडी आहे तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. मोंथा चक्रीवादळामुळे पाऊस होत असल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, आता नोव्हेंबरची 10 तारीख असतानाही सतत पाऊस सुरू आहे. राज्यात काही भागात गारठा आहे. जेऊर आणि धुळ्यात थंडीची लाट आली. किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेले. बंगालच्या उपसागरात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. पहाटे गारठा अधिक अनुभवायला मिळतंय. मात्र, असे असले तरीही पावसाचे ढग अजूनही कायम आहेत.
भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, दुसरीकडे काही राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे देशावर डबल संकट बघायला मिळतंय. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे थंडीची लाट येईल.
10 नोव्हेंबर रोजी केरळ येथे आणि 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये थंडीची लाट असेल. पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दक्षिण हरियाणाच्या काही भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा अंदाजे 4 ते 7 अंश सेल्सिअस कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढणार आहे.
उर्वरित उत्तर मध्य महाराष्ट्रात सुमारे 2-4 अंश सेल्सिअसने तापमानात घट होईल. पुढील 3 दिवसांत ईशान्य भारतातील किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने घट होईल. धुके राहण्याची शक्यता आहे. हिमालयामध्ये बर्फ वृष्टी झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला. महाबळेश्वर पेक्षा जळगावच्या तापमानात प्रचंड घट झाली 10.5 सेल्सिअस तापमानाचा पारा आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण प्रचंड वाढले असून या थंडीमुळे थंडीमुळे हुडहुडी प्रचंड वाढले असून काही भागात धुक्याची चादर पसरायला सुरुवात झाली आहे.
हवामानात बदल झाल्याने रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण मानले जात आहे गहू हरभरा या पिकांना पोषक वातावरण हे असल्याचे चित्र आहे. हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झाले आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येईल. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा बसला नाही. आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुखद गारव्याचा अनुभव येत आहे…


