गेली 28 वर्षे कोल्हापूरकरांसह पर्यटकांना कोल्हापूरची ओळख सांगणार्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमान नुकतीच पाडण्यात आली. या कमानीच्या पुनर्उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
स्वागत कमान नेमकी उभारायची कुठे, अशी विचारणा महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे केली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेने एनएचआयला नुकतेच दिले आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून शिरोलीकडून शहरात प्रवेश करण्यासाठी तावडे हॉटेल येथे 1997 साली स्वागत कमान उभारण्यात आली होती. गेली 28 वर्षे कोल्हापूरकरांसह पर्यटकांना कोल्हापुरात दाखल झाल्याची आठवण करून देणारी आणि कोल्हापूरची ओळख सांगणार्या या कमानीची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली होती. कमानीची दुरवस्था लक्षात येताच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकार्यांसमवेत कमानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नवीन कमान उभारणीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
कोणत्याही क्षणी कमान ढासळून अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका यंत्रणेतर्फे गुरुवारी रात्री स्वागत कमान उतरविण्यात आली. त्यानंतर कमान पुनर्उभारणीची चर्चा सुरू झाली. मात्र पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात सांगली फाटा ते उचगाव येथे पिलर उड्डाणपूल उभारणे आणि कोल्हापुरात प्रवेशासाठी बास्केट बि-ज उभारणीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. बास्केट बि-ज कोल्हापूर शहरात कुठेपर्यंत असणार याचा अंदाज घेऊन स्वागत कमानीचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह महापालिका अधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी चर्चा केली आहे. स्वागत कमान नेमकी कुठे उभारायची, बास्केट बि-ज नेमका कुठपर्यंत येता, याबाबत स्वागत कमानीचे नेमके लोकेशन समाजण्यासाठी महापालिका अधिकार्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना पत्र दिले आहे. पाधिकरणाकडून लोकेशनबाबत नेमकी माहिती मिळताच कमान उभारण्यासाठी डिझाईन बनविणे, अंदाजपत्रक तयार करणे शासनास पाठविण्यासाठी प्रस्ताव पाठविणे आदी प्रक्रिया केली जाणार आहे.
एनएचआयच्या निर्णयावर कमानीचे लोकेशन
स्वागत कमान नेमकी कुठे उभारायची याबाबत एनएचआयच्या निर्णयावर ठरणार आहे. एनएचआयने महापालिकेस पत्र दिल्यानंतर स्वागत कमानीचे नेमके लोकेशन ठरणार आहे. त्यामुळे एनएचआयच्या पत्राची प्रतीक्षा आहे.



