ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी नेण्यात आलं आहे. डिस्चार्जच्या वेळी त्यांचा मुलगा बॉबी देओल तिथे उपस्थित होता. सोमवारी दुपारपासूनच धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंंता व्यक्त करण्यात येत होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याची माहिती वारंवार त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत होती. मंगळवारी त्यांच्या निधनाच्या अफवाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यावर मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
मीडिया अतिरेक करत असल्याचं दिसतंय आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,’ अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली होती. तर ‘जे काही घडतंय ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे त्यांच्याबद्दल जबाबदार चॅनेल्स अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा,’ अशा शब्दांत त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला होता.
धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.


