अर्धवट जाळलेल्या कोंबड्याचे पाय, हळदी कुंकू, पान सुपारी व राख. एका कार्यकर्त्याच्या घरासमोर टाकून भानामती करण्याचा अघोरी प्रकार वडगावातील दहा नंबरच्या प्रभागात १५) उघडकीस आला. यामुळे शहरात खळबळ उडाली असून असे प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वडगाव नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तापत असून पॅनेल प्रमुखांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चुरस चांगलीच वाढली आहे. घराघरात भेटीगाठी, प्रचारयात्रा, मतदारांना विविध आश्वासने अशी राजकीय हालचाल जोरात असतानाच दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी निवडणुकीतील विजयासाठी जादूटोणा, भानामतीसारख्या अघोरी अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचे प्रकारही समोर येत आहेत.
प्रभाग क्रमांक दहा मधील एका आघाडीच्या वरच्या फळीतील कार्यकर्त्याच्या घरासमोर अर्धवट जाळलेली कोंबडी, हळदी कुंकू, पानसुपारी, लिंबू, राख हे सर्व एकत्र करून रात्रीच्या वेळी ठेवून गेल्याचे सकाळी उघडकीस आले. निवडणुकीत सर्वच जागांवर कडवी लढत होत आहे. उमेदवार आणि पॅनेल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने काहींची भोंदू, देवरशांकडे ये-जा वाढल्याचे दिसून येत आहे. विजय मिळवण्यासाठी गंडेदोरे, उतारे, काळ्या बाहुल्या, लिंबू अशी साधने देवरशांकडून घेतली जात असल्याच्या चर्चा शहरात रंगू लागल्या आहेत.
वडगावसारख्या शैक्षणिक हब म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धाळू प्रकारांचा शिरकाव झाल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका बाजूला मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅली, जेवणावळी आयोजित केल्या जात असताना दुसरीकडे करणी-भानामतीसारखे प्रकार दिसू लागल्याने निवडणुकीला अघोरी वळण लागल्याची चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकारांमुळे भोंदू, देवरशी यांची चांगलीच चलती सुरू असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीतील स्पर्धा खेळीमेळीच्या असताना अशा अंधश्रद्धेच्या गोष्टींमुळे वितुष्ट निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत. या सर्व प्रकारांना वेळीच पायबंद घालण्याची मागणी होत आहे.




