करवीर तालुक्यातील नागदेवाडी, साबळेवाडी आणि शिंगणापूर या तीन ठिकाणी अमावस्येच्या रात्री करणी, भानामती, काळी जादू यांसारखे अघोरी प्रकार केल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तिन्ही ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्याने अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या भोंदूबाबा, महाराजांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
साबळेवाडीत एका कुटुंबाच्या फोटोवर टोचल्या टाचण्या
साबळेवाडीतील एका कुटुंबाने नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. घराच्या मागील बाजूस कुटुंबातील दोन भाऊ आणि त्यांच्या आईच्या फोटोवर टाचण्या मारलेल्या व त्याच्या बाजूला लिंबू, केस, ब्लेड व बिब्बा ठेवलेला आढळून आला. नवीन बांधकाम सुरू असताना अशा वस्तू सापडल्याने कुटुंबासह परिसरात भीती निर्माण झाली आहे.
नागदेवाडीत झाडावर खिळ्याने ठोकली लिंबूसह बाहुली
नागदेवाडीमध्ये एका शेतातील झाडावर लिंबूसह खिळ्याने ठोकलेली बाहुली आढळली. झाडाखाली टाचण्या टोचलेले लिंबू आणि नारळ ठेवलेले होते. अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर करणी किंवा जादूटोणासाठी केला जातो, असा समज असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. संबंधित शेतकर्याने ते साहित्य तत्काळ पेटवून दिले.
शिंगणापूर-उत्तरेश्वर पेठ मार्गावर 100 हून अधिक टाचण्या टोचलेले लिंबू
शिंगणापूर ते उत्तरेश्वर पेठ या मुख्य रस्त्यावर 100 पेक्षा अधिक टाचण्या टोचलेले आणि हळद-कुंकू लावलेले लिंबू एकाच ठिकाणी पडलेले दिसून आले. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.




