जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पहूर–जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईतजवळ एका भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत जामनेर शहरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची(accident)वेळ रात्री साडेदहाच्या सुमाराची असून घटनास्थळाच्या धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.चारही तरुण एकाच दुचाकीवरून जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना चिरडले. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकी आणि तरुण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जामनेर शहरात मोठी हळहळ आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची ओळख अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवी सुनील लोंढे अशी झाली आहे. हे सर्वजण २० ते २२ वयोगटातील तरुण मित्र होते. जामनेरपुरा आणि भीमनगर येथील रहिवासी असलेल्या या चौघांच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या घरी शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जामनेर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मालवाहू वाहनाचा चालक जुबेर कुरैशी हा देखील जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
पहूर पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून अपघातास(accident) कारणीभूत असलेल्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चालकाचा वेग, निष्काळजीपणा आणि वळणावर नियंत्रण सुटल्याचं कारण तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे पालन यावरील प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.दरम्यान, पुण्यातही मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. डेक्कन परिसरातील गरवारे कॉलेज शेजारी झालेल्या या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



