देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राला देखील यावर्षी पावसाचा चांगलाच तडाखा बसला, महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या चक्रीवादळाला डिटवाह असं नाव देण्यात आलं आहे, यमन देशानं या चक्रीवादळाला हे नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ तीस नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
हवामान विभागनं दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ सेन्यारचे रुपांतर हे निकोबर बेटाच्या उत्तरेला 850 किलोमीटर अतंरावर आता कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे आता आणखी एक चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे, चक्रीवादळ डिटवाह हे आता उत्तर -पश्चिमेकडे सरकत असून ते 30 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ डिटवाहच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील काही जिल्ह्यांमध्ये चेन्नई तसेच आध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाकडून या प्रदेशांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दक्षिण भारतामधील काही राज्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान दुसरीकडे उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे, मध्य भारतात देखील थंडी वाढण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात हवामान विभागाकडून कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र सरासरी तापमानाता घट होऊन पठारी प्रदेशात थंडीची लाट पहायला मिळू शकते असा अंदाज आहे.



