सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचा हंगाम चालू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सभा आणि प्रचारांचा धुरळा उडाला आहे. राज्यातील वेगवेगळे पक्ष मतदारांना आकर्षक आश्वासनं देत आहेत. सत्ताधारी तर लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा स्वार होऊन महिला मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. असे असतानाच आता मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 14 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले जाणार आहेत. परंतु आता सरकारचा हा निर्णय नियमांच्या कचाट्यात सपडतो की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढे येत लाडक्या बहिणींमधील संभ्रम दूर केला आहे. त्यांनी पात्र लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार की नाही? याबाबत सांगितले आहे.
नेमकी काय अडचण येऊ शकते?
राज्य सरकार लाडक्या बहिणींना 14 जानेवारी रोजी तीन हजार रुपयांची मदत करणार आहे. हे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यावर पाठवले जातील. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. हीच बाब लक्षात घेता निवडणूक आयोग राज्य सरकारला लाडक्या बहिणींचा हफ्ता लांबवण्याचे आदेश देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तसे झाले तर लाडक्या बहिणींना 14 जानेवारी 3000 रुपये मिळणार नाहीत. म्हणूनच निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यास सरकारला लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





