लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून अत्यंत हृदयद्रावक (Sad News) आणि धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या शाहूताई यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेवर तीव्र टीका होत असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
काय आहे सविस्तर प्रकरण?
आज पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने त्यांना अहमदपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटेच्या वेळेस अनेक खासगी रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध नव्हते.नातेवाइकांनी तब्बल एक तासभर वेगवेगळ्या रुग्णालयांत डॉक्टरांचा शोध घेतला. शेवटी पर्याय संपल्याने त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वीच शाहूताई कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या अकाली निधनामुळे अहमदपूर शहरासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
शाहूताई कांबळे कोण होत्या?
शाहूताई कांबळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्यांना उमेदवारी मिळाली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहूताई कांबळे यांनी जिद्दीने निवडणुकीत बाजी मारली होती. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत त्या १२ मतांनी पराभूत झाल्या होत्या. मात्र, यंदा झालेल्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.
अजित पवारांची भावुक प्रतिक्रिया
नियतीसमोर माणूस कितीही कणखर असला, तरी कधी कधी तो हतबल ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या आकस्मिक निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक आहे. मी जनसेवेचा प्रामाणिक ध्यास असलेल्या शाहूताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो’ अशी भावुक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ही घटना अहमदपूरमधील आरोग्य सुविधांच्या कमतरतेचे उघड दर्शन घडवणारी आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीला आपत्कालीन स्थितीत वेळेत उपचार मिळाले नाहीत, यामुळे स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेत तातडीने सुधारणा कराव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.






