शहरातील वाढती वाहतूक कोंडी, धोक्यात येणारा सुरक्षित प्रवास वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी विविध पर्याय आणि उपाययोजना सुचविल्या आहेत; मात्र हे उपाय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महापालिकेचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या अभ्यासानुसार, शहरातील अनेक ठिकाणी चुकीचे पार्किंग, अरुंद रस्ते, अतिक्रमण आणि विस्कळीत सिग्नल प्रणालीमुळे वाहतूक खोळंबते. यावर उपाय म्हणून एकेरी वाहतूक, काही रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्गांचा वापर, स्मार्ट सिग्नल व्यवस्था आणि नो-पार्किंग झोनची कडक अंमलबजावणी असे पर्याय सुचवले आहेत.
याशिवाय, शाळा सुटण्याच्या वेळेत आणि गर्दीच्या तासांत विशेष वाहतूक नियोजन करण्याचा प्रस्तावही मांडला आहे; मात्र या सर्व उपाययोजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे आहे. रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटवणे, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन आणि वाहतूक शाखेशी समन्वय साधणे या बाबी महापालिकेच्या अखत्यारीत येतात.
मंडई, मार्केटमध्ये पार्किंग व्यवस्था करावी
शहरातील आठवडा बाजार आणि कायमस्वरुपी बाजारामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. त्याचे स्वतंत्र नियोजन होणे आवश्यक आहे. गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर बाजारात झालेल्या अपघातात दोन ठार झाले. आजही बाजारातही धोका कायम आहे.
लक्ष्मीपुरी (रविवार), कसबा बावडा (रविवार), महाद्वार (शनिवार), ऋणमुक्तेश्वर गंगावेश (कायमस्वरुपी) येथे पार्किंगची व्यवस्था करावी, अन्यथा बाजार स्थलांतरित करावा. अशीच शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, राजारामपुरी मार्केट येथे पार्किंग व्यवस्था करावी.
हे करणे आवश्यक
फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवा – महाद्वार रोड, महालक्ष्मी चौक ते साकोली कॉर्नर, लुगडी ओळ, भवानी मंडप ते बिंदू चौक जेल रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पार्वती सिग्नल ते बागल चौक
सिग्नल दुरुस्ती – नवीन वाशी नाका, मलाबार चौक, बागल चौक, तावडे हॉटेल, गोखले कॉलेज, देवकर पाणंद
बसथांबे स्थलांतर – कोंडा ओळ सिग्नलवरून कोरे हॉस्पिटलजवळ (बस थांबा) आणि रंकाळा बसस्थानक – संभाजीनगर बसस्थानकाजवळ
शहरात प्रमुख रस्त्यांवर भरत असलेल्या बाजारांना पर्यायी व्यवस्था करून देणे
पादचाऱ्यांसाठी फूटपाथ अतिक्रमणमुक्त करणे
हॉटेल, मंगल कार्यालय, हॉस्पिटल, बॅंक, शोरूम येथे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करणे
शहरात ८२ आस्थापना असून पैकी ४१ आस्थापनांना पार्किंग व्यवस्था नाही.
(यादी महापालिकेला दिली आहे)
मोठ्या इमारतीतील पार्किंग खुले करावे. सध्या तेथे दुकान गाळे आहेत
पाणीपुरवठ्यासह अन्य कामांसाठी रस्ता खोदाईसाठी दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे
सर्व बसस्थानके, प्रमुख चौक, उपनगरातील चौकात सेफ सिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसवणे
परगावाच्या पर्यटकांसाठी अंबाबाई मंदिरातून शटल बस सेवा सुरू करणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवास होण्याला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून महापालिकेला वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन केले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार झाला आहे. यात सुधारणा झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, प्रवास सुरक्षित होईल.
– नंदकुमार मोरे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा.
महापालिकेची भूमिका
रस्ते दुरुस्ती व रुंदीकरण
अतिक्रमण
हटवणे अधिकृत पार्किंग व्यवस्था
वाहतूक पोलिसांशी समन्वय
नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य






