गॅस टंचाईच्या काळात स्वयंपाकासाठी रेशनकार्डधारकांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गॅस वितरणासाठी ४५ दिवसांचे बुकिंग करण्याची अट घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक अन्य पर्यायांचा इंधनासाठी विचार करतील.
त्यामुळे थेट आक्रमण नैसर्गिक साधनसंपत्तीवर होऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची भीती आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून रॉकेल विक्री बंद करण्यात आली आहे. परंतु सद्यःस्थिती पाहता, ते पूर्ववत रेशनवर देण्याची वेळ आली आहे.
ते उपलब्ध करून दिल्यास या संकटकाळात तो चांगला पर्याय होऊ शकेल. याचा गांभीर्याने विचार व्हावा. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, दीपक शिराळे, इंदुमती मिरजकर, तानाजी चव्हाण, दीपक मिरजे, साताप्पा भास्कर, दिनकर पाटील, आशीष आडवडेकर, शीतल शिराळे, अरुण यादव, संग्राम भास्कर, महेश माने, महेश सोरटे, सुरेश पाटील, भास्कर कांबळे, मुकेश सोरटे आदी उपस्थित होते.





