पेट्रोल पुरवठ्यातील विसंगतीमुळे उद्भवलेल्या पेट्रोल-डिझेलच्या कृत्रिम टंचाईपासून नागरिकांना आज काहीसा दिलासा मिळाला. पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये दोनशे आणि चारचाकीमध्ये दोन हजार रुपयांच्या मर्यादेमुळे सर्वांना इंधन मिळाले.
त्यामुळे दोन दिवस असणाऱ्या रांगा ओसरल्या.
मात्र, अजूनही ऑईल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे २० पेट्रोल पंप बंद होते. गुरुवारी सायंकाळपासून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्याने शुक्रवारपासून (ता. २७) पुरवठा नेहमीसारखा सुरळीत होईल, असे जिल्हा पेट्रोल पंप चालक संघटनेकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेवरून अभुतपूर्व गोंधळ झाला होता. आज हा गोंधळ काही प्रमाणात कमी झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याला निर्बंध घातले. त्यामुळे रांगेतील प्रत्येकाला इंधनाची हमी मिळाली. यामुळे आज नागरिकांच्या रांगा फारशा नव्हत्या. कमी वेळेत मर्यादित इंधन मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, इंधनाचा साठा संपल्याने शहरासह जिल्ह्यातील सुमारे २० पेट्रोल पंप बंद होते. काही पेट्रोल पंप दिवसभर, तर काही पेट्रोल पंप दुपारनंतर बंद झाले. इंधनाचा साठा उपलब्ध झाला तसे शहरातील काही पेट्रोल पंप सायंकाळी पुन्हा सुरू झाले.
जिल्ह्यातील बहुतांशी पेट्रोल पंपांनी पैसे भरून आपली मागणी ऑईल कंपन्यांकडे नोंदवली आहे. कालपासून इंधनाचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सर्व पेट्रोल पंप पूर्ण क्षमतेने सुरू होतील. मुबलक इंधनसाठा असल्याने ग्राहकांनी चिंता करू नये.
– अरविंद तराळे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल पंप चालक संघटना टँकरमुळे अडचण
ज्या ऑईल कंपन्यांचे स्वतःचे टँकर आहेत त्यांचा इंधन पुरवठा सुरळीत आहे. मात्र, ज्यांना ट्रान्स्पोर्ट कंपन्यांकडून टँकर घ्यावे लागतात त्यांच्या पुरवठ्यात विसंगती दिसते. त्याचा परिणामही इंधन पुरवठ्यावर झाल्याचे दिसते.
दोन वितरकांकडे गॅससाठी रांग
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. नोंदणी केल्यानंतर चार ते पाच दिवसांत सिलिंडर घरपोच मिळत आहेत. मात्र, संभाजीनगर आणि मंडलिक वसाहत येथील वितरण केंद्राबाहेर अजून ग्राहकांची रांग दिसून येते.


