कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. रेंदाळ येथे घराच्या अंगणात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा तडफडून मृत्यू झाला आहे.
मोटारच्या वायरचं आवरण तोंडाने सोलत असताना विजेचा जोरदार धक्का बसून हा मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
एकुलत्या एक मुलाचा मृत्यू; पाण्यासाठी जीव धोक्यात
हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील मुजावर गल्लीतील रहिवासी सुबहान यासीन नाईकवाडे (वय १७) हा आपल्या घराच्या अंगणात पाण्याची मोटार सुरू करत असताना ही दुर्घटना घडली. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास नळाला पाणी आल्याने सुबहानने मोटार सुरू केली होती. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने पाणीपुरवठा बंद केला. परंतु, घरातील मोटारीचे बटण बंद करायचे राहिल्याने वायरमध्ये विद्युत प्रवाह सुरूच राहिला होता. दुपारी अडीचच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि तीनच्या सुमारास पुन्हा पाणी आल्याने सुबहान मोटारीची वायर हाताळत पिन जोडण्यासाठी गेला. यावेळी वायरचे आवरण तोंडाने काढत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
सुबहानने आरडाओरड केली, मात्र पाणी भरण्याच्या गडबडीत सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आलं नाही. हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काठीच्या साहाय्याने त्याला बाजूला सारून तातडीने वीजपुरवठा बंद केला.
त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं. सुबहान हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता; त्याच्या पश्चात आई-वडील आणि छोटी बहीण असा परिवार आहे. गावात पाच ते आठ दिवसांनी आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना नाइलाजाने मोटारी लावाव्या लागतात, त्यामुळे पाण्यासाठी एका मुलाचा बळी गेल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
