राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना व केंद्राची आष्युमान भारत योजना एकत्रित केली. त्याअंतर्गत रुग्णास पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय झाला. आता योजनेत तब्बल दोन हजार ३९९ आजार समाविष्ठ आहेत.
दोन वर्षांपूर्वी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १७०० रुग्णालयांमध्येच होती. त्यात बहुतेक रुग्णालये सरकारी होती. आता दोन हजार दोन हजार ८८० रुग्णालये वाढविण्यास शासनाने मंजुरी दिली असून त्यात बहुतेक रुग्णालये खासगी आहेत.
आयुष्यमान भारत योजनेतून आता शुभ्र, केशरी व पिवळ्या रेशनकार्डधारकांनाही मोफत उपचार घेता येणार आहेत. पूर्वी योजनेतील बहुतेक रुग्णालये शासकीय (उपजिल्हा, जिल्हा रुग्णालये, सिव्हिल हॉस्पिटल) होती. खासगी रुग्णालयांची संख्या अत्यल्प होती आणि बहुतेक शहरांमधील नामांकित रुग्णालये योजनेतच नव्हती. त्यामुळे रुग्णांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक जिल्ह्यातील मोठी खासगी रुग्णालये देखील आयुष्यमान भारत योजनेत अंतर्भूत केली जात आहेत. त्या रुग्णालयांकडून प्रस्ताव मागवून कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.
काही महिन्यांत योजनेत नव्याने समाविष्ठ झालेल्या ८०० खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. आता पुढे आणखी दोन हजार ८० रुग्णालयांचा समावेश योजनेत होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. प्रत्येक आजारावर त्या रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांची कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. प्रत्येकांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढून घ्यावे, त्या कार्डवर रुग्ण पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत घेऊ शकेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यातील बहुतेक खासगी रुग्णालये असतील योजनेत
आयुष्यमान भारत योजनेत पूर्वी राज्यातील १७०० रुग्णालयांचा सहभाग होता. आता एकूण चार हजार ५८० रुग्णालये समाविष्ठ करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यातील अडीच हजार रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. बाकीच्या रुग्णालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून त्यांचाही काही महिन्यात योजनेत समावेश होईल. प्रत्येक जिल्ह्यातील बहुतेक मोठी खासगी रुग्णालये आता योजनेत असतील.
– डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन समिती, महाराष्ट्र
योजनेतील रुग्णालयांची सद्य:स्थिती
सध्याची रुग्णालये
२,५००
आता वाढणारी रुग्णालये
२,०८०
उपचाराच्या रकमेची मर्यादा
५ लाख
योजनेतील आजार
२,३९९





