दिवाळीच्या सणात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, तसेच भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली.
या मोहिमेत संशयास्पद व्यवहारांप्रकरणी १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले. तसेच, दोन लाख ३१ हजार किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, सुमारे सहा कोटी ८६ लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला (Rs 6.86 crore food products seized in Pune) आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १७ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तूप आदी खाद्यपदार्थांची बाजारपेठा आणि दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. पुणे विभागातील सात सहाय्यक आयुक्तांनी प्रत्यक्ष तपासणी मोहिमेत सहभाग घेतला. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
सणासुदीच्या काळात मिठाईच्या दुकानांसह खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बाजारपेठा आणि मिठाईच्या दुकानांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. तपासणीदरम्यान संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, ते प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनीही जागरूक राहून खाद्यपदार्थांमधील भेसळीबाबत प्रशासनाकडे तक्रार करावी.
श्रीकांत करकाळे, सह आयुक्त (प्रभारी), अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग
अशी झाली कारवाई
विशेष मोहीम १७ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
एकूण तपासणी एक हजार १७२
सुधारणा नोटीस ३९२
रद्द झालेले परवाने १११
दंड १७ लाख (१६० तक्रारी)
जप्त माल दोन लाख ३१ हजार किलोग्रॅम
जप्त माल (रक्कम) सहा कोटी ८६ लाख
पाच जिल्ह्यांचा समावेश पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली.
