महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेत चुका झालेल्या महिलांना दुरुस्तीची अंतिम संधी देण्यात (beneficiaries) आली असून त्यासाठी आता केवळ ४८ तास शिल्लक राहिले आहेत. ३० एप्रिल २०२६ ही KYC दुरुस्तीची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर चुकीची माहिती असलेल्या लाभार्थ्यांचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीला सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र त्यानंतर शासनाने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली. यामध्ये पात्रता निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांचे नाव यादीतून वगळण्यात आले.
सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांनी ती पूर्ण केली, मात्र काहींनी माहिती भरताना चुकीची उत्तरे दिल्याचे निदर्शनास आले. काहींना प्रश्न व्यवस्थित न समजल्याने चुका झाल्याचेही सांगितले जात आहे. अशा महिलांना आता माहिती दुरुस्त करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून यापूर्वी KYC साठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली होती. मात्र अनेक तक्रारी आणि अडचणी लक्षात घेऊन आता दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
दरम्यान, KYC पडताळणीनंतर आणखी काही लाभार्थ्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पात्रता निकष पूर्ण न करता लाभ घेतलेल्या महिलांची माहिती पडताळणीत समोर येऊ शकते. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ पुढे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. योजनेतील लाभ सुरू ठेवायचा असल्यास महिलांनी तातडीने KYC तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

