Thursday, May 14, 2026
Homeमहाराष्ट्रमुख्य परीक्षेत तो प्रश्न.. नीट पेपरफुटीचे थेट लातूर कनेक्शन? नामांकित क्लाससंचालक रडारवर....

मुख्य परीक्षेत तो प्रश्न.. नीट पेपरफुटीचे थेट लातूर कनेक्शन? नामांकित क्लाससंचालक रडारवर. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ

एनटीएने नीट परीक्षा 2026 रद्द केली आहे. पेपरफुटीनंतर ही घोषणा करण्यात आली. राजस्थान ते केरळ आणि बिहार ते महाराष्ट्रापर्यंत या प्रश्न पत्रिका फुटीचे कनेक्शन समोर येत आहे.

 

संबंधित व्यक्तींची धरपकड CBI आणि संबंधित तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. राजस्थान पोलिसांची पथकं विविध राज्यात तपास करत आहेत. त्याआधारे काही जणांना उचलण्यात आले आहे. या पेपरफुटीत सर्वात पहिले नाशिकचा संबंध समोर आला. शुभम खैरनार याला सीबीआयने काल उचलले. त्यानंतर इतर शहरांसह लातूरचेही कनेक्शनही समोर आले आहे.

 

मंगळवारी लातूर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

 

प्रश्न पत्रिका फुटीप्रकरणात लातूर येथील काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका परिक्षार्थीच्या पालकांनी पेपरफुटीप्रकरणात मंगळवारी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, लातूर येथील एका खासगी कोचिंग क्लासने नीट (यूजी)-2026 मुख्य परीक्षा होण्यापूर्वी एक मॉक टेस्ट घेतली होती. या चाचणी परीक्षेतील 42 प्रश्न कथितरित्या मुख्य परिक्षेत विचारलेल्या प्रश्नांसारखेच आहेत. त्यामुळे हा क्लास संचालक तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. पेपर लीक प्रकरणात या क्लास संचालकांचा सहभाग तर नाही ना, याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी घेतली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात संशयितांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. लातूर पोलीस प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना याप्रकरणी मोठे आव्हान केले आहे. याप्रकरणात कुणालाही काही माहिती असेल तर त्यांना तात्काळ ही माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे याप्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

 

शुभम खैरनारने 5 लाख कमावले

 

NEET पेपरफुटीप्रकरणात नाशिक कनेक्शन उघड झाल्यानंतर यंत्रणा शहरात कालच दाखल झाल्या होत्या. त्यांनी मोठ्या कसरतीनंतर शुभम खैरनार याला ताब्यात घेतले. त्याला घेऊन पथक आता मुंबईकडे रवाना झाले आहे. 27 वर्षांच्या शुभम खैरनार याला कुरियरद्वारे प्रश्नपत्रिका मिळाली होती. त्याने त्यासाठी 10 लाख रुपये मोजल्याचे समजते. तर ही प्रश्नपत्रिका त्याने एकाला 15 लाख रुपयांना विक्री केल्याचे समोर आले आहे. या व्यवहारातून त्याने 5 लाख रुपये कमाई केली. कोणीही ओळखू नये यासाठी त्याने वेशभूषा बदलली होती. पण तांत्रिक तपासाआधारे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -