Tuesday, May 26, 2026
Homeकोल्हापूरअखेर गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा :  मतदार यादी प्रक्रियेला सुरूवात

अखेर गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा :  मतदार यादी प्रक्रियेला सुरूवात

बहुचर्चित कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळ च्या पंचवार्षिक निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

 

त्यामुळे एक प्रकारे गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी या कार्यक्रमाला मंजुऱी दिली आहे.

 

दरम्यान, गोकुळच्या संभाव्य निवडणुकीवरून सरकार आणि न्यायालयीन पातळीवर संघर्ष सुरू असतानाच शासनाने मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचा अर्थ महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गोकुळ निवडणुकीचा समेट झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवारी कोल्हापुरात अज्ञात स्थळी झालेल्या गोकुळ च्या माजी संचालकांच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत सुतोवाच केले होते.

 

ठराव प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या हालचाली आता अधिक गतिमान होणार आहेत. मंगळवार (दि. 26) पासून सहाय्यक निबंध कार्यालया मार्फत दूध संस्थांना ठरावाचे विहित नमुन्यातील फॉर्म पाठवण्यास सुरवात होईल. मतदार यादी चा एकूण कार्यक्रम 36 दिवसाचा असेल. 2 जून ते 1 जुलै पर्यंत संस्था पातळीवर ठरावाद्वारे प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू राहील. 1 जुलै ही ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत असेल.

 

एका बाजूला अवसयानातील दूध संस्थांच्या पात्रते संदर्भात सुनावणी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला समांतर असा मतदार यादीचा कार्यक्रम सुरू राहील. अवसयानातील पात्र संस्थांचा समावेश नंतर मतदार यादीत केला जाईल.

 

लाख मोलाची ठराव प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील गावागावात आता गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटणार आहे. गोकुळची निवडणूक पावसाळ्यानंतरच होणार हे स्पष्ट असले तरी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मतदार संस्थांच्या ठरावाद्वारे निश्चित होणार आहेत. त्यामुळे मतदार यादी प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -