Homeमहाराष्ट्रदेहू आळंदीतून पालखी पुण्यात येणार? वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आवाहन, वारकरी ऐकेनात!

देहू आळंदीतून पालखी पुण्यात येणार? वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आवाहन, वारकरी ऐकेनात!

आषाढी वारी २०२६ मधील मानाच्या पालख्यांचे प्रस्थान अवघ्या काही तासांवर आले आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे होईल, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होईल.

 

 

तत्पूर्वी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आळंदी देहूतील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू आळंदीला येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आवाहन धुडकावून लावत आम्ही देहू आळंदीला जाणारच, असा पवित्रा वारकऱ्यांनी घेतला आहे.

देहू आणि आळंदीला येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

 

 

मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात दिनांक ०६/०७/२०२६ रोजी रेड अलर्ट दिला असून त्याप्रमाणे देहू व आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणी साठा वाढला आहे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक ०७ आणि ०८ जुलै रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे, असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. याबात सर्वांनी सयंम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.

 

इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, नदीची पात्र दुथडी भरून वाहू लागली, पूल पाण्याखाली

 

 

इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५-२० तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्यावर झाला असून याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत येऊ नये, आवाहन करण्यात आले आहे.

जे होईल ते माऊली बघून घेतील, वारकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम

 

 

पावसाची परिस्थिती पाहता आळंदी देहूला येऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वारकऱ्यांना केले आहे. मात्र काही झाले तरी वारीत खंड कसा पडू द्यायचा? जे होईल ते माऊली बघून घेतील, असे म्हणत वारकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी काय म्हणाले?

 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड पडल्याच्या घटना घडल्या आहेत अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सर्व ठिकाणी प्रशासन ऑन फिल्ड काम करत आहे. मावळ तालुक्यात दुर्दैवाने आणि काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात पावसाने 2 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. ठिकठिकाणी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. मावळ आणि खेड तालुक्यात अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याला आज रेड तर उद्या ऑरेंज अलर्ट आहे. लोकांनी बाहेर पडणे टाळावे. थोड्याच वेळात कनेक्टिंग लिंक वरचे काम पूर्ण होईल आणि वाहतूक सुरळीत होईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -