Homeमहाराष्ट्रकेतन अग्रवालच्या आजोबांचं निधन; आठवड्याभरापूर्वीच नातवाला न्याय मिळावा म्हणून उतरले होते रस्त्यावर

केतन अग्रवालच्या आजोबांचं निधन; आठवड्याभरापूर्वीच नातवाला न्याय मिळावा म्हणून उतरले होते रस्त्यावर

केतन अग्रवालच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. नातवाच्या मृत्यूनंतर अवघ्या १७ दिवसांनी, केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं शनिवारी रात्री पुण्याच्या एका रुग्णालयात निधन झालं.

 

नातवाच्या विरहाचे दुःख सहन न झाल्यामुळेच त्यांचं निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडिया पोस्टवरून निधनाची माहिती दिली.

 

देवीचंद अग्रवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान, केतनची हत्या झाली. नातवाच्या निधनाचा त्यांना जबर धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद यांची प्रकृती खालावत गेली. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. देवीचंद यांना नातवाच्या जाण्याने मोठा धक्का बसला होता आणि तेव्हापासून ते मानसिकदृष्ट्या खचले होते. हा धक्का आणि दुःख त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे, असं न्यूज १८ ने वृत्तात म्हटलं आहे.

 

‘माझ्या म्हातारपणाचा आधार गेला’

 

२७ जून रोजी तब्येत ठीक नसतानाही देवीचंद अग्रवाल त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीत काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. मृत्यूच्या काही दिवसांआधी, देवीचंद अग्रवाल यांनी आपल्या नातवाला न्याय मिळवून देण्यासाठी भावूक आवाहन केले होते. ज्या लोकांवर कुटुंबाने अनेक दशके विश्वास ठेवला, त्यांनीच विश्वासघात केल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. “सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी डोळ्यांत पाणी आणून केली होती.

 

सियासाठी घेतलं होतं गिफ्टो

 

सिया गोयलचा १९ जून रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं, असंही केतनच्या आजोबांनी सांगितलं होतं. मात्र, त्याआधीच सियाने केतनची हत्या केली.

 

‘एएनआय’ (ANI) शी बोलताना ते केतनच्या मृत्यूने अत्यंत खचलेले दिसत होते. ते म्हणाले होते, “माझ्या म्हातारपणाचा आधार गेला.” केतनच्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबासोबत असलेल्या जुन्या संबंधांची आठवण करून देत देवीचंद म्हणाले होते, “आम्ही त्या मुलीच्या कुटुंबाला ३५ वर्षांपासून ओळखत होतो. त्यांच्या मुलीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, हे तिच्या कुटुंबाला ठाऊक होतं… तिच्या काकू आणि काकांनी आमच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला होता. त्यांनी मला ११० वेळा सांगितलं होतं की, काळजी करू नका, मुलगी खूप चांगली आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -