Homeमहाराष्ट्रअलमट्टी धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडले

अलमट्टी धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडले

महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम अलमट्टी धरणावर झाला आहे. धरणाने यंदाच्या हंगामात प्रथमच जवळपास पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला असून, वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे प्रशासनाने धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडून तब्बल १.१० लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.

 

अलमट्टी धरणाची कमाल साठवण क्षमता ५१९.६० मीटर पातळीवर १२३.०८१ टीएमसी इतकी असून, धरण पूर्ण क्षमतेपासून अवघ्या २६ सेंटीमीटर अंतरावर आहे. बुधवारी सायंकाळी धरणाची पातळी ५१९.३४ मीटरवर पोहोचली होती. त्यावेळी वाढत्या आवकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने यंदाच्या हंगामात प्रथमच धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडले होते.

 

गुरुवारी सकाळी विसर्गाचे प्रमाण काहीसे कमी करण्यात आले असले, तरी कृष्णा नदी अद्याप दुथडी भरून वाहत आहे. धरण प्रशासनाने गुरुवार, दि. ३० जुलै रोजी दुपारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार धरणाची पाणीपातळी ५१९.२५ मीटर (आरएल) इतकी नोंदविण्यात आली. धरणातील एकूण पाणीसाठा ११७.०३८ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ९९.४१८ टीएमसी इतका आहे. धरणात सरासरी ८३.३८६ क्युसेक पाण्याची आवक होत असून एकूण विसर्ग ९७,०७९ क्युसेक आहे. कालवा सिंचनासाठी ४५३ क्युसेक, तलाव भरणासाठी ५८५ क्युसेक, वीज निर्मितीसाठी ४२,५०० क्युसेक, स्पीलवेमधून ५३,१२५ क्युसेक्स तसेच इतर वापरासाठी ४१५ क्युसेक्स पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे नदीपात्रात एकूण ९५,६२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

 

सतर्कतेचा इशारा

 

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने बागलकोट, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढविण्यात येऊ शकते, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -