पद्मश्री आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होतेत्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार सतेज पाटील आणि उद्योगपती संजय पाटील यांचे ते वडील होत.
डी. वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असे होते. ते प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जात होते. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच प्रसिद्ध डी. वाय. पाटील ग्रुपचे ते संस्थापक होते.
महाराष्ट्रात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नावाने राज्यात अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालये उभी राहिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
डी. वाय. पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला होता. १९५७ ते १९६२ या कालावधीत त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम केले. त्यानंतर १९६७ ते १९७२ या काळात पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र, १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. १९८३ मध्ये नवी मुंबई येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक शैक्षणिक संस्था आणि आरोग्यसेवा प्रकल्प उभारून त्यांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.


