गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर जुने चेकबुक ३१ डिसेंबरनंतर रद्द होणार असून, नवे अल्फा न्यूमरिक कोड असलेले चेकबुक घेणे बंधनकारक असल्याचा संदेश फिरत आहे.
त्यामुळे अनेक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र,
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशभरातील जुनी चेकबुक रद्द करण्याचा कोणताही सार्वत्रिक आदेश दिलेला नाही. उलट, चेक व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
‘बीएसबीडी’ : २५ पाने मोफत
‘आरबीआय’च्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांसाठीच्या नव्या निर्देशांनुसार, एक एप्रिल २०२६ पासून अशा खातेदारांना वर्षाला किमान २५ पानांचे चेकबुक मोफत देणे बँकांना बंधनकारक आहे. याशिवाय एटीएम किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट व मोबाइल बँकिंग सुविधाही वार्षिक शुल्काशिवाय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यासाठी किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही.
चेक क्लिअरिंग त्याच दिवशी
चेक क्लिअरिंगसाठी ‘आरबीआय’ने बॅच पद्धतीऐवजी सतत क्लिअरिंगची व्यवस्था सुरू केली आहे. चार ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चेक सादर करता येतो. संबंधित बँकेला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागते. मंजुरीनंतर एका तासात रक्कम खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. मात्र, तीन तासांत क्लिअरिंगचा पुढील टप्पा तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
‘कट-ऑफ’ वेळ महत्त्वाची
नियम असूनही प्रत्यक्ष व्यवहारात बँकेची अंतर्गत ‘कट-ऑफ’ वेळ महत्त्वाची ठरते. पुण्यातील अनेक बँकांमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी १२ पूर्वी चेक दिल्यास त्याच दिवशी क्लिअरिंगची शक्यता अधिक असते. ड्रॉप बॉक्समध्ये उशिरा टाकलेले चेक पुढील कामकाजाच्या दिवशी प्रक्रिया होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बँकेची ‘कट-ऑफ’ वेळ आधीच जाणून घ्यावी. चेक दिलेल्या दिवशी सकाळपासूनच खात्यात पुरेशी रक्कम ठेवणेही आवश्यक आहे.
चेक बाउन्स व पॉझिटिव्ह पे
चेक वारंवार बाउन्स होऊ नयेत यासाठी बँकांना स्वतंत्र धोरण आखण्याचे निर्देश आहेत. ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक वेळा चेक बाउन्स झाल्यास चेकबुक सुविधा किंवा खाते बंद करण्याची कारवाई होऊ शकते. तसेच, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ सुविधेचा वापर केल्यास फसवणूक टाळण्यास मदत होते. त्यात चेकची तारीख, रक्कम आणि लाभार्थ्याची माहिती बँकेला आधी द्यावी लागते.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नवे अल्फा न्यूमेरिक कोड असलेले चेकबुक घेण्याचा आदेश हा सर्व बँकांसाठी लागू नसून, बँक ऑफ इंडियाचा अंतर्गत सुरक्षा बदलांशी संबंधित आहे. त्यामुळे जुने चेकबुक फेकून देण्याची किंवा तातडीने बदलण्याची गरज नाही. आपल्या बँकेकडून अधिकृत सूचना मिळाल्यासच पुढील कार्यवाही करावी.
थोडक्यात, चेकबुक बंद होणार नसून, चेक व्यवहार अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यावर भर आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील संदेशांपेक्षा बँकेच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवणेच योग्य ठरेल.
