अहिल्यानगर वीजबिलाच्या थकबाकीमुळे वर्षानुवर्षे अंधारात राहिलेल्या घरांसह बंद पडलेल्या व्यवसायांना पुन्हा प्रकाशमान होण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी अभय योजना लागू झाली आहे.
थकीत असलेल्या वीजबिलावर व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत सवलतही मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीचा बोजा कमी करून पुन्हा मोफत वीजजोडणी घेण्याची संधी आहे. १५ जानेवारी २०२७ पर्यंत ही योजना लागू असेल. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व अन्य बिगरकृषी ग्राहक आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी असलेल्या योजनेतून कृषी ग्राहक, सार्वजनिक नळपाणीपुरवठा वगळल्या आहेत. थकबाकीदारांना त्यांच्या बिलातील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ होणार आहे, तर मूळ थकीत बिल एकरकमी किंवा हप्त्याने भरण्याची सोय आहे.
१५ डिसेंबरपर्यंत जो थकबाकीदार एकरकमी बिल भरेल, त्याला अर्ली बर्ड रिबेटचा फायदाही मिळेल. ज्यांची वीज तीन वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित आहे. तेही पुरवठा पूर्ववतची सुविधा आहे. त्यांना मूळ थकबाकीत १०, तर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत दिली जाईल. जे थकबाकीदार ५० टक्के रक्कम भरतील, त्यांना सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांची व्यवस्थाही आहे.
