Homeमहाराष्ट्र'या' कंपनीने बदलले कर्मचाऱ्यांचे नशीब, एका झटक्यात ५,००० हून अधिक कर्मचारी झाले...

‘या’ कंपनीने बदलले कर्मचाऱ्यांचे नशीब, एका झटक्यात ५,००० हून अधिक कर्मचारी झाले ‘करोडपती’

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी Anthropic ने अमेरिकेच्या शेअर बाजारात दमदार पदार्पण केले आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी Nasdaq वर १११.५० डॉलर दराने सूचीबद्ध झाले.

 

हा दर कंपनीच्या ८३ डॉलरच्या IPO किमतीपेक्षा जवळपास ३४ टक्क्यांनी अधिक होता. या विक्रमी आयपीओच्या माध्यमातून अँथ्रोपिकने तब्बल ८१.३ अब्ज डॉलर उभारले असून, जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीच्या नावावर होता.

 

अँथ्रोपिकच्या कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव

 

अँथ्रोपिकच्या शेअर बाजारातील या विक्रमी प्रवेशामुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचे नशीब उजळले आहे. कंपनीच्या शेअर्सच्या वाढलेल्या मूल्यातून अनेक कर्मचारी करोडपती झाले आहेत. नियामक संस्थांकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबरपर्यंत अँथ्रोपिकमध्ये सुमारे ५,३०० कर्मचारी कार्यरत होते. यापैकी जवळपास सर्व कर्मचाऱ्यांकडे आता १० लाख डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे शेअर्स असल्याचा अंदाज आहे.

 

CNN च्या अहवालानुसार, कंपनीतील सुमारे ५,१०० कर्मचाऱ्यांकडे, म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९६ टक्के कर्मचाऱ्यांकडे १० लाख डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे शेअर्स आहेत. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ८.४ कोटी रुपये होते. याशिवाय, जवळपास २,८०० कर्मचाऱ्यांकडे १ कोटी डॉलरपेक्षा अधिक मूल्याचे शेअर्स असल्याचा अंदाज आहे. तर सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या शेअर्सचे मूल्य १० कोटी डॉलर, म्हणजेच जवळपास ८४० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.

 

वॉल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO

 

AI चॅटबॉट Claude विकसित करणाऱ्या अँथ्रोपिकचा आयपीओ वॉल स्ट्रीट आणि जागतिक टेक उद्योगाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. कंपनीचा आयपीओ १० नोव्हेंबर २०२६ रोजी खुला झाला आणि १७ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद झाला. या काळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांसह अनेक मोठ्या कंपन्यांनीही आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी बोली लावली. या माध्यमातून कंपनीला एकूण १०७.३ अब्ज डॉलरच्या बोली मिळाल्या.

 

सुरुवातीला कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर ७० ते ७८ डॉलरचा प्राइस बँड निश्चित केला होता. मात्र, गुंतवणूकदारांकडून मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता हा दर वाढवून ८३ डॉलर करण्यात आला. आयपीओमध्ये कंपनीने ९८ कोटी, म्हणजेच ९८० दशलक्ष शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले. त्यातून कंपनीने ८१.३४ अब्ज डॉलर उभारले.

 

लिस्टिंगनंतर शेअर ११५ डॉलरच्या पातळीवर

 

नॅस्डॅकवर लिस्टिंगच्या दिवशी अँथ्रोपिकचा शेअर १११.५० डॉलरवर खुला झाला. आयपीओच्या ८३ डॉलरच्या किमतीच्या तुलनेत हा ३४.३ टक्क्यांचा प्रीमियम होता. व्यवहारादरम्यान शेअरने ११५.१० डॉलरचा उच्चांक गाठला. मात्र, नंतर त्यात घसरण झाली आणि दिवसअखेर तो ९७.१७ डॉलरवर बंद झाला. या कामगिरीनंतर कंपनीचे बाजारमूल्य सुमारे १.७६ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. बाजारमूल्याच्या बाबतीत अँथ्रोपिकने एकाच दिवसात सौदी अरामको, ब्रॉडकॉम, मेटा आणि टेस्ला यांसारख्या दिग्गज कंपन्यांनाही मागे टाकले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -