भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांची तयारी सुरू करणार आहेत. यापूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन खेळाडू या मालिकेतून बाहेर पडल्याने, न्यूझीलंडला आपल्या एकदिवसीय संघात बदल करण्यास भाग पडले आहे.
पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यासाठीचा संघ आधीच जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, न्यूझीलंडचे मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र अद्याप त्यांच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेले नाहीत, असे समोर आले आहे. हे दोन्ही खेळाडू टी-२० मालिकेतही खेळतील अशी अपेक्षा होती, परंतु दुखापतींमुळे ते बाहेर राहिले. आता एकदिवसीय मालिकेतही त्यांचा सहभाग जवळपास अशक्य वाटत आहे. मार्क चॅपमनला हॅमस्ट्रिंगचा ताण आला आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अंदाजे दोन आठवडे लागतील, असे वृत्त आहे. रचिन रवींद्रचा एका प्रमोशनल शूटदरम्यान त्याचा खांदा निखळला आहे. त्याला मैदानावर परतण्यासाठी काही वेळ लागेल.
दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केले आहे की, टिम सायफर्टचा पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेत डावाची सुरुवात केली होती आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. यापूर्वी, त्याचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. याचा अर्थ सायफर्ट आता संपूर्ण पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. याशिवाय, क्रिकेट बोर्डाने हेन्री निकोल्स आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांचाही संघात समावेश केला आहे. निकोल्स फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर फॉक्सक्रॉफ्ट शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल. मॅट फिशरदेखील आता सर्व सामन्यांमध्ये खेळू शकतो. यापूर्वी तो फक्त शेवटचे दोन सामने खेळत होता, पण आता त्याचा पहिल्या तीन सामन्यांसाठीही संघात समावेश करण्यात आला आहे.
