दसऱ्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. बेसनाचे लाडू, कुरकुरीत भाजणीची चकली, लाडूचा घमघमाट आणि अनारशांशिवाय दिवाळी अपूर्णच. नोकरदार महिलांना वेळेअभावी फराळ करणे शक्य होत नसल्याने, त्या घरगुती फराळ बनवणाऱ्या महिलांवर अवलंबून असतात.
यातून अनेक महिलांच्या हाताला दिवाळीच्या काळात मोठा रोजगार मिळतो. मात्र, यंदा दुष्काळजन्य परिस्थिती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे घरगुती फराळालाही महागाईची मोठी झळ बसली आहे. फराळाच्या प्रत्येक पदार्थामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली असून, ग्राहकांनी यंदा फराळ खरेदीला आखडता हात घेतला आहे.
खाद्यतेल, तूप, डाळी आणि सुकामेवा यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने घरगुती फराळ विक्रेत्या महिलांना नाईलाजाने दर वाढवावे लागले आहेत. स्थानिक घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांचे यावेळेसचे दर पाहिल्यास महागाईचा आलेख स्पष्ट दिसतो. विशेष मागणी असलेली भाजणीची चकली ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर बेसनाचे लाडू ६५० ते ७०० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. शुद्ध तुपात बनवलेले पारंपरिक गोड पदार्थ, जसे की अनारसे आणि करंजीचे दर तर ८०० ते ८५० रुपये किलोपर्यंत भिडले आहेत.
ऑर्डर्समध्ये घट एकीकडे महागाई वाढली असली तरी, दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. याचा थेट परिणाम फराळाच्या ऑर्डर्सवर झाला आहे. घरगुती फराळ बनवणाऱ्यांची प्रतिक्रिया बाजारपेठेचे प्रातिनिधिक चित्र मांडते.
कमी ऑर्डर आल्या मागच्या वर्षी या वेळेपर्यंत १६० किलो फराळाची बुकिंग झाली होती आणि दिवाळीपर्यंत आणखी ऑर्डर्स येत होत्या. पण यंदा आतापर्यंत फक्त ६० किलो फराळ बुक झाला आहे. दिवाळीपर्यंत अजून किती ऑर्डर्स येतील, हे सांगता येत नाही. -वंदना देशमुख
नाईलाजाने भाव वाढ खाद्यतेल १९० ते २०० रुपये लिटरवर गेले असून हरभरा डाळ, गॅस, वीज बिल वाढले आहे. या वाढत्या खर्चामुळे नाइलाजाने प्रत्येक पदार्थामागे ५० ते १०० रुपये वाढवावे लागले. भाव वाढल्याने आता ग्राहकही फराळ खरेदी करताना विचार करू लागले आहेत.
यंदाचे फराळाचे दर (प्रतिकिलो) – एका दृष्टीक्षेपात भाजणीची चकली- ६०० रुपये बेसनाचे लाडू- ६५० ते ७०० रुपये पातळ पोहे / मुरमुरे चिवडा- ४०० ते ४५० रुपये शेव (बारीक/मसाला/तिखट)- ४५० रुपये साखरेचे/गुळाचे अनारसे- ८५० रुपये (शुद्ध तुपातील) करंजी- ८०० रुपये गोड शंकरपाळे- ४०० ते ६०० रुपये
मागील वर्षीचे दर भाजणीची चकली- ५०० रुपये बेसनाचे लाडू- ४०० रुपये पातळ पोहे / मुरमुरे चिवडा-३२० रुपये शेव (बारीक/मसाला/तिखट)- ४०० रुपये साखरेचे/गुळाचे अनारसे- ७०० रुपये करंजी- ६०० रुपये गोड शंकरपाळे- ४२० रुपये

