भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी जागतिक ब्रोकरेज संस्था गोल्डमन सॅक्सने अत्यंत सकारात्मक संकेत दिले आहेत. कंपनीने भारतीय इक्विटी बाजाराचे मानांकन ‘ओव्हरवेट’ केले असून, डिसेंबर २०२७ अखेरपर्यंत निफ्टी २८५०० अंशांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
कंपन्यांच्या नफ्यातील दमदार वाढ, मजबूत देशांतर्गत मागणी आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी विविधीकरणाची संधी यामुळे भारतीय बाजारपेठ आकर्षक ठरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गोल्डमन सॅक्सने भारतीय शेअर बाजाराबाबत सकारात्मक भूमिका घेत डिसेंबर २०२७ अखेरपर्यंत निफ्टी २८,५०० अंशांवर पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात केले आहे. कंपन्यांच्या नफ्यात मध्यम ते उच्च दुहेरी अंकांची वाढ, मजबूत देशांतर्गत मागणी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील तुलनेने कमी गुंतवणूक ही त्यामागील कारणे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर विविधीकरण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक पर्याय ठरू शकतो, असेही गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे.
गुंतवणूक-उपभोगावर परिणामाची शक्यता
व्याजदरवाढीमुळे देशाचा आर्थिक विकासदर मंदावण्याची शक्यता असली, तरी देशांतर्गत मागणी आणि खासगी उपभोग अर्थव्यवस्थेला आधार देतील, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. ऊर्जा, धातू आणि धोरणात्मक उत्पादन क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे नवे चक्रही आर्थिक घडामोडींना चालना देऊ शकते.
मात्र, कर्जावरील व्याजाचा वाढता भार, कंपन्यांचा वाढणारा भांडवली खर्च आणि करकपातीचा परिणाम कमी होणे यामुळे उपभोग आणि गुंतवणुकीच्या वाढीवर मर्यादा येऊ शकतात. असे असले तरी ऊर्जा सुरक्षा, संरक्षण आणि पुरवठा साखळीशी संबंधित क्षेत्रांमधील गुंतवणुकीमुळे २०२७ मध्ये प्रत्यक्ष गुंतवणुकीचा विकासदर सुमारे ८.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
रुपया ९६ पर्यंत घसरण्याचा अंदाज
चालू खात्यातील तूट वर्ष २०२६ आणि २०२७ या दोन्ही वर्षांत जीडीपीच्या सुमारे एक टक्का राहण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रातील निर्यात आणि परदेशातून येणाऱ्या पैशांच्या प्रवाहामुळे ही तूट नियंत्रणात राहू शकते. दुसरीकडे, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पुढील तीन महिन्यांत ९४ रुपये, सहा महिन्यांत ९५ रुपये आणि १२ महिन्यांत ९६ रुपये राहण्याचा अंदाज गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे.
