Kolhapur: ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप; 39 जणांना नोटीस

कोल्हापूर शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे.ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दोन आरोग्य निरीक्षकांवरही दैनंदिन काम जबाबदारीने न केल्याने दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

ठेकेदार भोसलेच्या कामातील दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून 24 हजार दंडाची शिक्षा करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रंमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश भोसलेला देण्यात आले होते.

या कामाचा कार्यादेश 15 फेब्रुवारी 2022 रोजी ठेकेंदार यांना देण्यात येऊन या कामास 180 दिवस मुदत दिलेली आहे. संबंधीत ठेकेदार भोसलेला विहित मुदतीत काम चालू केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंड ठोठावण्याची सूचना उप-शहर अभियंतांना दिली. त्याप्रमाणे विभागीय कार्यालय क्र.2 ने ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांना त्यांच्या अदा करावयाच्या बिलातून विलंब आकार 24 हजार कपात केला.

आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व करण लाटवडेंना दंड

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक निरिक्षक राजेंद्र पाटील यांना 2 हजार रुपयांचा दंड तर आरोग्य निरिक्षक करण लाटवडे यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सदरचा दंड त्यांच्या पगारातून वसूल केला जाईल. शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव, डर्टी स्पॉटचे सौंदर्यीकरण, नाला/चॅनेल सफाई करणेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना फिरतीवेळी ए-3 चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व ई-3 चे आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांच्या भागामध्ये दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्याचे निदर्शनास आले.

दिलेल्या जबाबदारीनुसार दैनंदिन काम केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी करण लाटवडे यांना व राजेंद्र पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागितला होता. या दोघांचा खुलासा आल्यानंतर प्रशासकांनी अमान्य करुन दंड ठोठावला.

Join our WhatsApp group