ब्रेकींग: पंढरपूरात 137 भाविकांना विषबाधा!

पंढरपूर येथे माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या भाविकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक भाविकांची प्रकृती खराब झाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहीतीनुसार, एक फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे तब्बल चार लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरचा माघ वारी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी झाले होते. माघ वारीचा सोहळा आनंदी वातावरणात भाविक साजरा करीत असतानाच तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना घडली आहे.

दरम्यान नवीन वर्षी माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी दिंडी 31 जानेवारी रोजी पंढरपुरात आले. मग पंढरपुरातील मठात भाविकांनी मुक्काम केला. पंढरपूर शहरातील एका दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भाविकांनी एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे बुधवारी 1 फेब्रुवारीला भगर आणि आमटी खाल्ल्याची माहीती मिळत आहे.

त्यानंतर आज (ता. 2 फेब्रुवारी) पहाटे 3-4 वाजेच्या जवळपास भाविकांना मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेमध्ये जवळील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हे एकूण 185 भाविक नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे समजते. तसेच या घटनेचा अधिक तपास देखील करण्यात येत आहे. पण या सर्वांत आता भगर हा पुन्हा चिंतेचा विषय बनत आहे.

Join our WhatsApp group