Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील

ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील



ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ओबीसी आरक्षण विषय काही दिवसांत मार्गी लावता येईल; पण महाविकास आघाडी सरकारला ते करायचे नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आरक्षणाचा कायदा कळत नाही. घटनात्मक तरतूद आणि कायद्याने केलेली तरतूद यातील फरक कळत नाही. त्यांना केवळ पैसा कळतो. जिल्हानिहाय ओबीसींची संख्या ठरवून आरक्षण निश्‍चित करायचे आहे; पण इच्छाशक्‍ती नाही. दिशाभूल करण्याचे काम मात्र ते पद्धतशीरपणे करत आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न न मिटवताच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊन दाखवाच, मतदार तुमची वाट लावणार आहेत. आघाडी सरकारमधील तीन पक्ष दिवसभर एकमेकांशी भांडतात आणि सरकार पडायचा मुद्दा आली की तिघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसतात, असा उपहासही त्यांनी केला

पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर आघाडी सरकार चालढकल करीत आहे. मागासवर्गीय आयोग नेमून मराठा समाज मागास असल्याचे निश्‍चित करावे लागेल. त्यासाठी आघाडी सरकारने प्रत्यक्ष काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र ते न करता 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या विषयावरून चालढकल सुरू आहे.प्रधानमंत्री कार्यालयाकडून दखल केंद्रीयमंत्री नारायण राणे अटकप्रकरण प्रधानमंत्री कार्यालयासह भाजपच्या सर्व नेत्यांनी गंभीरपणे घेतले आहे. राणे यांना अटक करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी पोलिसांवर टाकलेल्या दबावाची क्‍लिप घराघरात पोहोचली आहे. परब यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करायची, पिटीशन दाखल करायची की त्यांच्यावर सुमोटो कारवाई होणार याची वाट पहात आहोत. सर्व कायदेशीर बाबी तपासून पहात आहोत. वकिलांची फौज त्यावर अभ्यास करत आहे. आता ते घाबरले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत यांचा समाचार

“भाजप-शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर एकच आहेत, पण भाजपमध्ये बाहेरून आलेले लोक शिवसेनेवर नाहक बोलतात”, असे विधान करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा पाटील यांनी समाचार घेतला. पाटील म्हणाले, भाजपमध्ये भांडणे लावण्याचा, आमच्यात भिंत उभी करण्याचा केविलवाणा प्रयत्न राऊत यांनी करू नये. गेल्या पाच वर्षांतील सामना पेपर काढा. पेपरमधून रोज भाजपला, मोदी-शहा, योगी, देवेंद्रना शिव्या देत होते. भाजपसोबत सत्तेत असतानाही ते विरोधकाप्रमाणे वागत होते.

काहीजण जात्यात; काहीजण सुपात

एकनाथ खडसे यांच्या मालमत्ता जप्तसंदर्भातील प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, काहीजण जात्यात आहेत, काहीजण सुपात आहे. दरम्यान ईडीच्या चौकशीसंदर्भातील प्रश्‍नावर ते म्हणाले, कर नाही तर डर कशाला. भाजपचे कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होईल. शंभर कोटीची बेनामी पॉपर्टी जप्त होते आहे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मंत्रीमंडळ बैठकीत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात! शंभर कोटींची बेनामी पॉपर्टी का जप्त झाली, याबद्दल चकार शब्दही ते त्यांना विचारत नसल्याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.


जिल्हा बँक निवडणूक : स्थानिक नेत्यांना अधिकार

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुका भाजप पक्ष म्हणून लढणार. सहकारी संस्थांच्या निवडणुकीची गणिते वेगळी असतात. जिल्हा बँकेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा व तालुका नेत्यांना अधिकार असतील. निवडणुकीत सत्ताधार्‍यांना नामोहरम करणे हा त्यांचा उद्देश असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -