Thursday, April 18, 2024
Homeकोल्हापूरगोकुळ संघाचा दूधपुरवठा रोखू; मुरलीधर जाधव यांचे आंदोलन..

गोकुळ संघाचा दूधपुरवठा रोखू; मुरलीधर जाधव यांचे आंदोलन..



शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची ‘गोकुळ’च्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी गोकुळ च्या एमआयडीसी कार्यालयात शुक्रवारी आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करीत अधिकार्‍यांना घेराव घातला. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी संचालक मंडळाच्या येत्या बैठकीत हा निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, 7 सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास ‘गोकुळ’मध्ये शिवसेना सत्तेत आहे, हे विसरून दूधपुरवठा रोखण्यासह चिलिंग सेंटर बंद पाडू, कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा जाधव यांनी दिला.

शिवसैनिकांनी शुक्रवारी प्रशासन अधिकारी डी. के. पाटील आणि बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील यांना घेराव घालत मागील संचालक मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यात जाधव यांच्या संचालकपदाची मंजुरी देण्याची मागणी केली. लेखी पत्राशिवाय कार्यालयातून कोणालाही बाहेर सोडणार नाही, असा पावित्रा शिवसैनिकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

दरम्यान, घाणेकर यांना येण्यास उशिरा झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी शंखध्वनी करीत गोकुळ प्रशासन आणि सत्ताधार्‍यांचा निषेध केला. गोकुळ प्रशासनास शासन आदेश मानावाच लागेल असे सांगत, घाणेकर यांनी येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्तीचा विषय पत्रिकेवर घेण्याची लेखी हमी आंदोलकांना दिली.

यावेळी मधुकर पाटील, महादेव गौड, साताप्पा भवान, रवींद्र माने, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही संचालक मंडळाची चूकच : घाणेकर
शासन आदेश झाल्यानंतर संचालकपदाची नियुक्ती होण्यात कोणतीच अडचण नसते. चेअरमन विश्वास पाटील यांना जाधव यांच्या नियुक्तीच्या शासन आदेशाबाबत माहिती दिली होती. संचालक मंडळापुढे विषय ठेवण्याची विनंती केली होती; पण दुर्दैवाने निर्णय न झाल्याने शिवसैनिकांना आंदोलन करावे लागल्याची खंत डी. व्ही. घाणेकर यांनी व्यक्त केली.

वीरेंद्र मंडलिक यांना पाडणारे हेच?
केंद्रीय मंत्र्याला सुट्टी दिली नाही, हे विसरू नका. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्राचा अवमान करण्याइतका गोकुळ दूध संघ मोठा झाला काय? असा संतप्त सवाल करीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने गोकुळ परिसर दणाणून सोडला. दरम्यान, वीरेंद्र मंडलिक यांचा पराभूत करण्यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच जबादार आहेत, असे सुचित करीत मुरलीधर जाधव म्हणाले, कट्टर हिंदुत्ववादी असल्यानेच मुश्रीफ यांचा आपणास विरोध आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेनाचा उमेदवार निवडणूक लढवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -