Friday, June 2, 2023
Homeसांगलीऊस बिलांसाठी स्वाभिमानीचा अर्धनग्न मोर्चा

ऊस बिलांसाठी स्वाभिमानीचा अर्धनग्न मोर्चा


तासगाव आणि नागेवाडी येथील खासदार संजय पाटील यांच्या कारखान्यांची ऊस बिले थकल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. शेतकर्यांची संपूर्ण ऊस बिलाची रक्कम तत्काळ न दिल्यास नग्न आंदोलन काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.


महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मंगळवारी दुपारी विश्रामबाग चौकात जमले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खासदार पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. महेश खराडे म्हणाले, खासदार पाटील गोरगरीब शेतकर्यांच्या भावनांशी खेळत आहेत. बिले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शेतकर्यांचे पैसे बुडविण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र पै अन् पेै वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.


यापूर्वी खासदारांनी 8 ऑगस्ट रोजी शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करतो असे सांगितले होते. त्यावेळी दहा शेतकर्यांना धनादेशदेखील दिले होते. परंतु उर्वरित शेतकर्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम वर्ग केली नव्हती. त्यामुळे आता अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याकडून काही शेतकर्यांना ऊस बिलापोटी धनादेश देण्यात आले. परंतु शेतकर्यांची संपूर्ण रक्कम न दिल्यास नग्न आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खराडे यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी…
थकीत ऊ स बिलासाठी शेतकर्यांनी तीन दिवस धरणे आंदोलन केले होते. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून बिले देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे “तुम्ही यामध्ये लक्ष घालावे व कारखाना व्यवस्थापनाला बिले लवकरात लवकर देण्याच्या सूचना द्याव्यात”, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
खासदारांनी विश्वासाला तडा दिला…
मोर्चासमोर बोलताना शेतकरी म्हणाले, खासदार संजय पाटील यांना तासगाव तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. तासगाव तालुक्याच्या जोरावरच त्यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी साद घातली म्हणून आम्ही त्यांच्या कारखान्याला ऊस दिला आहे. परंतु, त्यांनी गोड बोलून शेतकर्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यामुळे आपण देखील आता निवडणुकीत योग्य तो निर्णय घ्यायचा, मग त्यांना शेतकर्यांची किंमत कळेल.
कारखान्याकडून 5 कोटी रुपयांचा धनादेश अदा
तासगाव आणि नागेवाडी कारखान्यांची बिले मिळावीत यासाठी सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी कारखान्यासमोर धरणे आंदोलनासाठी बसले होते. त्या शेतकर्यांची यादी बनवून संघटनेकडून कारखान्याकडे देण्यात आली होती. त्या शेतकर्यांचे 11 सप्टेंबर 2021 चे धनादेश आज मोर्चा दरम्यान देण्यात आले. तर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांना 3 सप्टेंबर 2021 रोजी धनादेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group