अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून पुण्यातील बड्या बिल्डरला धमकी

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला धमकी देण्यात आली आहे. अजित पवारयांच्या मोबाईल क्रमांकावरून बांधकाम व्यवसायिकाला फोन करून त्याच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी एका ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी गेल्या काही दिवसांपासून बांधकाम व्यावसायिकाला ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकीचे फोन करत होते. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय’ असे सांगत होते. वाडेबोलाई येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी देखील आरोपींना व्यावसायिकाला धमकी दिल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींनी संगनमताने गूगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले होते. या ॲपद्वारा आरोपींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिक फोन करत होते. अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय, असं सांगून 20 लाख रुपयांची खंडणी मागत होते. त्याचबरोबर वाडेबोलाई येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद लवकर मिटवून टाका, अशी धमकी देखील त्यांनी दिली होती.

Join our WhatsApp group