चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीला चाकूने भोसकले

चारित्र्याच्या संशयावरुन व्यसनी पतीने पत्नी आणि मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना माजरी-भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी मुलीवर चंद्रपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीरेंद्र रामप्यारे साहनी (43) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वेकोलीच्या ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर-10 क्वार्टर नंबर-77 मध्ये आरोपी वीरेंद्र साहनी हा पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (36) आणि मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (17) यांच्यासोबत राहतो. वेकोली माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून त्याला गांजाचे व्यसन आहे. तसेच वीरेंद्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून त्याने हे हत्याकांड घडवून आणले.
संशयातून वीरेंद्रने पत्नी सुमतीच्या पोटात व छातीत पाच धारदार चाकूने पाच वार केले. तर मुलगी सिमरनच्या पोटात एक घाव केला. या हल्ल्यात दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या. दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेकोली माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सुमनचा मृत्यू झाला. तर मुलगी सिमरनवर चंद्रपूर येथील कुबेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यापाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हेही घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर वीरेंद्र तिथून पळून गेला. मात्र वसाहतीची भिंत ओलांडून विसलोन गावच्या रेल्वे मार्गाने पसार होत असतानाच माजरी पोलिसांनी कुचना कॉलनीतील काही युवकांच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात माजरीचे ठाणेदार विनीत घागे व पथक करीत आहे.

Open chat
Join our WhatsApp group