Friday, March 29, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी फेस्टिव्हलचा २४ सप्टेंबरपासून शुभारंभ!

इचलकरंजी फेस्टिव्हलचा २४ सप्टेंबरपासून शुभारंभ!

इचलकरंजी फेस्टिव्हल २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हलच्या धर्तीवर आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २८ वर्षापासून इचलकरंजी फेस्टिव्हल साजरे केले जात आहे.

यंदा रविवार २४ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी सौ. मौसमी बर्डे – चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे- पाटील, ताराराणीचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सर्व पोलिस अधिकारी व मारवाडी समाजातील मान्यवर यांच्या हस्ते मानाची श्री गणेश महाआरती होऊन फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात येईल. त्यानंतर राजस्थानी लोकगीते, नृत्यांचा राजस्थानी सांस्कृतिक कलामंच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सोमवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता महिला आणि पुरुषांसाठी विनामूल्य पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता इचलकरंजी शहर पत्रकार व शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते मानाची श्री महाआरती करण्यात येईल. त्यानंतर इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटातील इचलकरंजी स्कुल डान्स कॉम्पिटिशन होईल. याचदिवशी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती होईल. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा बदनामीकारक खोटा इतिहास पुसून वास्तवता समोर आणणारी तेजोमय पराक्रमाची गाथा पोवाडा नाट्य शंभूराजे हा कार्यक्रम होईल.

मंगळवार २६ रोजी सकाळी ७ वाजता १६ वर्षाखालील मुले-मुली व खुला गट या गटातील मॅरेथॉन होईल. सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती झाल्यानंतर मिस अॅन्ड मिसेस इचलकरंजी स्पर्धा होईल. बुधवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे व मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश महाआरती होईल. त्यानंतर इचलकरंजी फेस्टिव्हल श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तर २८ सप्टेंबर रोजी झेंडा चौक येथे विसर्जन मिरवणूकीत इचलकरंजी फेस्टिव्हल स्वागत कक्षातून सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांना मानाची पान- सुपारी देण्यात येणार आहे.

या सर्वच कार्यक्रमात सहभागी होण्यासह कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजिका सौ. मौश्मी आवाडे, अहमद मुजावर, शेखर शहा आणि इचलकरंजी फेस्टिव्हलच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -