रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अंगावर डोंगरावरून अचानक दगड कोसळल्याने चार वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून मार्लेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री मार्लेश्वर इथं दुपारी ही घटना घडली.रुत्वी संदीप पाटील (वय ४ वर्षे, रा. ईश्वरपूर, ता. वाळवा) असं नाव आहे. या दुर्घटनेत तर तिचे वडील आणि चुलते जखमी झाले आहेत. पाटील कुटुंबीय आपल्या टाटा सुमो वाहनाने सकाळी मार्लेश्वर देवदर्शनासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. निसर्गरम्य परिसरात त्यांनी कुटुंबासोबत फोटो काढले, काही काळ आनंदाचे क्षण घालवले. त्यानंतर मार्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या मार्गावरून ते पुढे जात असताना दत्तमंदिरासमोर अचानक डोंगरावरून मोठा दगड कोसळला. हा दगड थेट चिमुकली रुत्वीच्या डोक्याला लागला. या दुर्घटनेत तिचे वडील आणि चुलतेही जखमी झाले.
डोळ्या देखत रुत्वी सोडून गेली
डोळ्यांसमोर आपल्या लाडक्या पुतणीवर काळाने घाला घातलेला पाहून चुलत्यांनी तिला तातडीने उचलून घेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने रुत्वीला वाचवण्यात यश आले नाही. तिला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी कुटुंबीय आनंदाने फोटो काढत होते, त्याच परिसरात काही क्षणांत मृत्यूचे सावट पसरले. सकाळी हसत-खेळत घराबाहेर पडलेली चिमुकली दुपारी कायमची निघून गेली. चार वर्षांच्या निरागस जीवाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तमंदिरासमोर पुलाच्या कामासाठी ब्लास्टिंग
दरम्यान, मार्लेश्वर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील दत्तमंदिरासमोर पुलाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर या परिसरात डोंगरावरून दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात दगड कोसळण्याची ही सहावी घटना असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
मार्लेश्वर हे कोकणातील प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. सांगली, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक आणि पर्यटक येथे येत असतात. विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? वारंवार दगड कोसळण्याच्या घटना घडत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? या दुर्घटनेची सखोल चौकशी करून धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

