Saturday, April 20, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू चा विळखा होतोय घट्ट!

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू चा विळखा होतोय घट्ट!


जिल्ह्यात डेंग्यू (dengu) ने अक्षरशः थैमान घातले आहे, असे असताना महापालिका, ग्रामपंचायतीच्या वतीने कोठेही औषध फवारणी होत नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्यासारखी स्थिती आहे.


गल्ली-बोळांत डासांनी दहशत निर्माण केली आहे. डेंग्यू, मलेरिया आजाराचा एखादा रुग्ण आढळला की, जिल्हा हिवताप कार्यालय खडबडून जागे होते. त्या भागाचा सर्व्हे केला जातो. काहींच्या चाचण्या केल्या जातात. कागदोपत्री घोडे नाचवले जाते आणि पुन्हा ही यंत्रणा सुस्तावते.


महापुरानंतर अनेक गावांत औषध फवारण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळेच डासांनी दहशत निर्माण केली आहे. कोरोनाच्या भीतीने सुरुवातीला कोरोनाची तपासणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह येतो. अंगातील ताप कमी येत नाही. त्यामुळे डॉक्टर पुढील तपासण्या करण्याचा सल्ला देतात. यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियासदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.



जिल्ह्यात महापुरानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, परिणामी साथीच्या विविध आजारांचा फैलाव सुरू आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासदृश आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत डेंग्यूने 3 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील डेंग्यू डासांचा फैलाव वाढत असताना, आरोग्य यंत्रणा सुस्तच आहे. आठ महिन्यांत शहरात डेंग्यूचे 60, ग्रामीण भागात 133, चिकुनगुनियाचे शहरात 66 व ग्रामीण भागात 26 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात मलेरियाचा 1 रुग्ण आढळला आहे.


जिल्हा हिवताप अधिकारी प्रभारी
कोरोनानंतर जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. याचे काहीच घेणे-देणे आरोग्य विभागाला नाही. शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने रुग्णांनी रोजच भरत आहेत. साथरोगासाठी विशेष वैद्यकीय पथक आहे; पण त्यांनी डेंग्यूची धास्ती घेतली आहे. जिल्हा हिवताप कार्यालयातील कारभार प्रभारी वैद्यकीय अधिकार्यांवर गेल्या दोन वर्षांपासून सोपविण्यात आला आहे.


डास उत्पत्तीची ठिकाणे
फ्रिजच्या मागील बाजूस साठलेले स्वच्छ पाणी, पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कुलरमधील पाणी, भंगार, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे आदी.


लक्षणे
एकाकी तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, भूक मंदावणे, तीव्र तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी-जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव, नाकातून रक्तस्राव, काळसर रंगाचे शौचास होणे, पोट दुखणे.


एडिस इजिप्ती डासांपासून डेंग्यूचा प्रसार होतो. त्याच्या पायावर चट्टे असतात, म्हणून त्याला टायगर मॉस्क्यूटो म्हणतात. हे डास दिवसा चावतात. डेंग्यू डास चावल्यापासून तापाचा लागण काळ तीन ते दहा दिवसांचा असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -