महाबळेश्वरचे पर्यटन पुन्हा बहरले


देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे व सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पर्यटनस्थळ सर्वासाठी खुले झाले आहे. येथील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेला वेण्णालेक नौकाविहारही शनिवारपासून पर्यटकांसाठी खुला झाल्याने महाबळेश्वरचे पर्यटन बहरले आहे.
गत सप्ताहात प्रशासनाच्यावतीने घेतलेल्या बैठकीत प्रेक्षणीयस्थळे सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल या परिसरात पहावयास मिळत आहे.


येथील अल्हाददायक थंड हवा, धुक्याची दुलई आणि डोळ्याचे पारणे फेडणारी हिरवाईचा सुखद अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत.

महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर हे जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असून, देशविदेशातील पर्यटकांच्या हक्काचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.


गेली चार पाच महिने कोरोना प्रादुर्भावामुळे वेण्णालेकसह येथील सर्वच प्रेक्षणीयस्थळे बंद होती. महाबळेश्वरकरांसाठी एप्रिल व मे महिन्याचा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. मात्र, कोरोनामुळे येथील सर्वांचेच गणित बिघडले. पर्यटकांनाही पर्यटनास मुकावे लागले.
दरम्यान, महाबळेश्वरमधील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आल्याने पर्यटक खुश आहेत. ओसंडून वाहणारा लिंगमळा धबधबा, धुक्यात हरवलेले केट्स विल्सन ऑर्थरसीट-मुंबई पॉईंट या प्रमुख प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाबळेश्वरचे पर्यटन बहरले आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group