कोल्हापूर : श्रद्धा हॉस्पिटलवर जिल्हा आरोग्य पथकाचा छापा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कागल तालुक्यातील बिद्री येथील डॉ. वाय. पी. पाटील यांच्या ‘श्रद्धा हॉस्पिटल’ वर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय चालू असल्याच्या संशयावरुन जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या हॉस्पिटलचे चालक डॉ. वाय. पी. पाटील तथा युवराज पाटील यांच्यावर मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेली १३ वर्षे हे हॉस्पिटल कोणत्याही शासकीय नोंदणीशिवाय सुरू होते. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या हॉस्पिटलकडे तालुका वैद्यकीय विभागाचे लक्ष कसे काय नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, बिद्री येथीलच डॉ. के. डी. फराकटे यांच्या ‘जीवनदीप नर्सिंग होम’ या हॉस्पिटलचीही संशयावरुन या पथकाने तपासणी केली. पण डॉ. फराकटे दवाखान्यात उपस्थित नव्हते. या कारवाईतील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्याचे काम मुरगूड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु होते.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसुतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची व वैद्यकीय गर्भपात कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहिम प्रभावीपणे राबवून अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने आज कारवाई केली. बिद्री कारखाना साईटवर डॉ. वाय. पी. पाटील यांचा ‘श्रद्धा हॉस्पिटल’ नावाचा खाजगी दवाखाना आहे. आरोग्य विभाग आणि शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय येथे रुग्णांची तपासणी करून अवैधरित्या तपासणी केली जात होती.

Join our WhatsApp group