सांगलीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घाणंद (ता. आटपाडी) येथील विवाहिता रूपाली सिद्धेश्वर होनमाने (वय 33) हिने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत विवाहितेचा भाऊ महेश बाळासाहेब केंगार याने बहिणीचे सासरे आबा होनमाणे, दीर महादेव होनमाणे, सासू रंगूबाई होनमाणे यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रुपाली हिचा विवाह सिद्धेश्वर होनमाणे यांच्याशी झाल्यानंतर 2009 पासून आजअखेर रुपालीचे सासू, सासरे व दीर हे तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. घरगुती कारणासह चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे, असे महेश केंगार यांनी दिलेल्या फिर्याद म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी करीत आहेत.

Join our WhatsApp group