Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे (Earthquake) तीन धक्के बसले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. कार रात्रीच्या सुमारास हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकपासून 15 ते 20 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी भागांमध्ये काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

धक्क्यांची तीव्रता किती?

भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्रीच्या सुमारास तीन वेळा भुकंपाचे धक्के बसले आहेत. 08 वाजून 58 मिनिटांनी 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. 09 वाजून 34 मिनिटांनी 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला आणि 09 वाजून 42 मिनिटांनी 1.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. भूकंपाचे हे सौम्य धक्के होते. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.

तालुक्यातील कोणत्या ठिकाणी बसले धक्के?

नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याविषयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील, दिंडोरी शहर, निळवंडी, जांबुटके, मडकीजांब, हातनोरे, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

हे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दरम्यान धक्के जाणवल्यानंतर जमिनी हादरली. यावेळी आवाज देखील झाला असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी एकमेकांना फोन करुन कोणकोणत्या भागांमध्ये धक्के बसले याची माहिती घेतली आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

का होतो भूकंप?

भूगर्भामध्ये टेक्टॉनिक प्लेट्सच्या तणावामुळे दाब निर्माण होतो. दाबमुक्त होण्यासाठी हालचाली होतात आणि एकमेकांवर घर्षण होऊन भूकंप होतो. जगभरात भूकंप मापन केंद्रामध्ये दरवर्षी भूकंपाचे जवळपास 20 हजार झटक्यांची नोंद होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -