कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केलंय. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी फारच धोकादायक ठरू शकते.जर असं घडलं तर, कदाचित भविष्यात सांगली आणि कोल्हापूर शहरांसह, कृष्णा-पंचगंगेच्या काठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊ शकते.

सांगली आणि कोल्हापूर ही महाराष्ट्रातली दोन ऐतिहासिक शहरं. या शेकडो वर्षांच्या इतिहासात या शहरांनी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे कित्येक पूर आणि महापूर बघितलेत. पण, २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षांमधे कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या महापुराने जे रौद्ररूप दाखवलं, तसं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. इतिहासातसुध्दा कुठं या भागात इतका प्रलयंकारी महापूर आल्याच्या नोंदी नाहीत.

२००५ला अलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि तिथली पाणी साठवण क्षमता ५१९ मीटरपर्यंत वाढवल्यानंतरच महाराष्ट्राला सातत्याने अशा पद्धतीच्या महापुराचा सामना करावा लागतोय. याचं कारण अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर हेच आहे, असं अनेकवेळा सप्रमाण सिद्ध झालंय. अलमट्टीतून पाणी सोडलं की, इथला महापूर ओसरतो, हेही स्पष्ट झालंय. त्यामुळे आता जर अलमट्टीची उंची वाढली, तर हा महापूर फार धोक्याचा ठरू शकतोय, हे लक्षात घ्यायला हवं.

सांगली-कोल्हापूरला धोका

सांगलीत कृष्णानदीची तळपातळी ५२७.६ मीटर तर कोल्हापूरात पंचगंगेची तळपातळी ५३०.१८ मीटर इतकी आहे. हिप्परगी धरणाची तळपातळी ५१० मीटर, तर महत्तम पाणीसाठा पातळी ५१६.६१ मीटर आहे. पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं तरी सांगली, कोल्हापूरला कोणताही धोका जाणवत नाही किंवा तिथंपर्यंत या धरणाचं बॅकवॉटर जात नाही. अलमट्टी धरणाची तळपातळी ४९८.९४ मीटर इतकी आहे. हे धरण जसजसं भरत जाईल तसतसं त्याचं बॅकवॉटर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या माध्यमातून सांगली-कोल्हापूरकडे सरकायला सुरवात होते.

अलमट्टी धरण ५१९ मीटरपर्यंत भरताच सांगलीतील पाण्याची पातळी ५२७ वरून ५४६ पर्यंत म्हणजे १९ मीटरने वाढते. याच प्रमाणात कोल्हापूरातील पंचगंगेच्या पाणीपातळीतही ५३० वरून ५४९ मीटरपर्यंत वाढ होणार, यात शंकाच नाही. याचाच परिणाम म्हणून २०१९ आणि २०२१ च्या महापुरावेळी सांगलीत कृष्णेची पातळी ५७.६ व ५४.६ फुटावर गेली होती. याच काळात कोल्हापुरात पंचगंगेची पातळी ५६.३ आणि ५५.७ फुटावर गेली होती.

दोन्ही शहरातली जवळपास निम्मी नागरी वस्ती पाण्याखाली गेली होती. शिवाय प्रमुख बाजारपेठांमधेही पाणी शिरलं होतं. याशिवाय या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरची शेकडो गावं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती.

शेकडो गावं पाण्याखाली जातील

अशा परिस्थतीत कर्नाटकने आता अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने म्हणजे १६.५ फुटाने वाढवण्याचा विचार चालवलाय. तसं झालं आणि त्यानंतर महापुराची परिस्थिती उद्भवली तर या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पातळीही त्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे २०१९ आणि २०२१ च्या महापुरात या दोन शहरांमध्ये आणि जिल्ह्यात जेवढी पाणीपातळी होती, त्यामध्ये किमान १६ फुटांची वाढ होणार.

या सगळ्याची नुसती कल्पना केली तरी सहज लक्षात येतं की, तशी परिस्थिती निर्माण झाली तर सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरातल्या झाडून सगळ्या नागरी वस्त्या आणि बाजारपेठा महापुराच्या कचाट्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचप्रमाणे या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा-पंचगंगा नदीकाठावरची शेकडो गावं होत्याची नव्हती होतील.

मूळच्या ५०० मीटर उंचीच्या अलमट्टी धरणाची उंची कर्नाटकने वेळावेळी आणि वेगवेगळी कारणं देत ५०५ मीटर, ५१२ मीटर, ५१९ मीटर अशी वाढवत नेली आणि आता ती ५२४ मीटर करण्याचा त्यांचा मानस आहे. या धरणात केवळ ५१७ मीटरपर्यंत पाणीसाठा केला तरी सांगली-कोल्हापूरची कशी वाताहत होते, ते २००५,२०१९ आणि २०२१च्या महापुराने स्पष्ट झालंय. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला पूर किंवा महापूर नवीन नाहीत. मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढत गेल्यापासून या भागात महापुराने जो कहर केला आहे, तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.

यापूर्वी या भागातले पूर किंवा महापूर फार फार तर एक-दोन दिवस असायचे, त्यानंतर लगोलग पूर ओसरून परिस्थिती पूर्वपदावर यायची. पण मागच्या तीन वर्षात पहिल्यांदाच महापुराचं पाणी थेट नागरी वस्त्या आणि बाजारपेठांमधे घुसलं. नुसतं घुसलं नाही तर महापूर नदीकाठच्या अनेक गावांमधे आठ-पंधरा दिवस मुक्कामच ठोकून होता.

जसजशी अलमट्टी धरणाची उंची वाढत गेली, तसतशी या भागाला महापुराची मगरमिठी आवळत गेलेली दिसते. हे सगळं पाहता, आता तरी महाराष्ट्राने डोळे उघडावेत आणि कृष्णामाईचा प्रकोप आपल्या राज्यावर ओढावणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

Join our WhatsApp group