राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला व ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयानुसार सवलतीचे तिकीट आता एनसीएमसी कार्डद्वारेच दिले जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९० प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू असून, त्यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सुरू असून, पुढील टप्प्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही ही सुविधा दिली जाईल.
टॉप-अप करणेही आवश्यक
सवलतीचा लाभ १ सप्टेंबरपासून घेण्यासाठी प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड सोबत बाळगणे व त्यात आवश्यक रक्कम ‘टॉप-अप’ करून ठेवणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील मानक कार्यप्रणाली (एसओपी) सर्व आगारांना पाठविण्यात आली आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी १ सप्टेंबरपूर्वी जवळच्या एसटी आगारात जाऊन एनसीएमसी कार्डची नोंदणी, वितरण व ‘टॉप-अप’ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’साठी एनसीएमसी कार्ड सक्तीला तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे उमटत नसल्याने नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यामुळे या गटासाठी काही काळ सक्ती लागू करण्यात आलेली नाही. महामंडळाने ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व पात्र प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे
सक्षम एनसीएमसी
सक्षम कार्ड आवश्यक मोफत प्रवास पासाचा लाभ घेण्यासाठी सशुल्क ‘रुपे ऑन द गो’ सक्षम एनसीएमसी कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड ईबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेडमार्फत वितरित करण्यात येत असून, एसटीच्या २५१ आगारांत, ३३५ वाहतूक नियंत्रण कक्षांत; तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेच्या अधिकृत एजंटमार्फत कार्ड नोंदणी व वितरण केले जात आहे. एसटीच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्ड मिळविण्यासाठी नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. पती-पत्नी संयुक्त मोफत पाससाठी स्वतंत्र माहिती द्यावी लागत असून, मृत कर्मचाऱ्यांच्या विधवा वा विधुरांनाही स्वतंत्र अर्ज प्रक्रियेद्वारे सुविधा मिळणार आहे.

